आज दिवाळी पाडवा आहे. यालाच बलीप्रतिपदा असेही म्हणतात.
पौराणिक कथेत प्रतिपदेच्या दिवशी महाप्रतापी आणि दानशूर राजा बळी यावर विजय प्राप्त करुन विष्णू जेव्हा वैकुंठात गेले तेव्हा लक्ष्मीने त्यांचे औक्षण करुन स्वागत केले.तसेच याच दिवशी पार्वतीने शंकराला द्युत या खेळात हरविले. म्हणून या दिवसाला द्युत पाडवा असेही म्हणतात
असा उल्लेख आहे.
*बदलत्या काळात जुन्या प्रथा परंपरांचा नव्याने अन्वयार्थ समजून घेतला तर आपल्या प्रत्येक पंरपरेत - रुढीत एक कौटुंबिक व सामाजिक आनंद निर्मिती
दडली आहे असे आपल्याला नक्कीच वाटेल.
दिवाळी पाडव्याचा जो संदर्भ दिला आहे त्याकडे आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर आपणास लक्षात येईल की पती पत्नीच्या एकमेकां विषयींच्या आदर भावना व्यक्त करण्यासाठी या प्रथा होत्या.
विजयी होवून येणाऱ्या पती विष्णूला त्याची पत्नी आदराने ओवाळते, त्याचा आदर सन्मान करते आणि विष्णू प्रसन्न होवून पत्नीला महालक्ष्मी संबोधतो, ही परंपरा आजच्या धकाकीच्या जीवनात पती-पत्नीतील आदर आणि परस्परांवरी विश्वास व्यक्त करण्यास पुरेशी आहे.
सहजीवनास प्रारंभ करताना दाम्पत्य एकमेकासाठी अनोळखी असतात. सहजीवन विस्तारते तसे एकमेकांना ते ओळखू लागतात. ओळखीतून विश्वास निर्माण होतो. विश्वास हा परस्परांवरील प्रेमात रुपांतरीत होतो. विश्वासाची अंतिम अवस्था परस्परांवरील आदरात असते. पती-पत्नीतील सुखाची किंवा समर्पणाची समाधिस्थ अवस्था ही परस्पराप्रति आदराची असते. हा आदर सहजीवनाच्या प्रारंभी कधीच नसतो. तेव्हा असते केवळ आकर्षण आणि शरीराचे समर्पण.
दिवाळी पाडव्याला पत्नी विश्वास आणि आदराने पतीला ओवाळते. आयुष्यातील लहान मोठ्या अडचणी किंवा समस्यांवर विजय मिळविल्याचा त्यात आनंद असतो. अशी पत्नी लक्ष्मी रुपात असते. कधीकधी पत्नी सुध्दा पती सोबत नियतीच्या संघर्षावर मात करते. अशी पत्नी पार्वती रुपात असते. म्हणूनच दिवाळीच्या पाडव्याला परस्परांप्रति असलेला आदर व्यक्त करण्यासाठी औक्षणाची करण्याची प्रथा अस्तित्वात आली.
दिवाळी पाडव्याच्या औक्षणानंतर पती-पत्नीस सस्नेह भेट देतो. अशी भेट देणे म्हणजे नात्यांची गुंफण अधिक घट्ट करणे होय. दिवाळी पाडव्याचा हा भावार्थ दाम्पती जीवनाला प्रगल्भ व समृध्द करणारा आहे असे मला वाटते.
सर्व मित्र परिवार व हितचिंतकांना दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!